आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

शहापूर-घोटी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाची मंजुरी द्या खासदार वाकचौरेंची मंत्री गडकरींकडे मागणी

1 min read

शिर्डी , दि. २५ (प्रतिनिधी) -शहापूर घोटी विशाखापट्टणम राज्यमार्ग क्रमांक ५० अकोले, संगमनेर, श्रीरामपूर तसेच नेवासा शेवगाव गेवराईमार्गे विशाखापट्टणम या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची परवानगी देऊन या राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्याची आग्रही मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रेल्वे सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी उपस्थित होते.

खासदार वाकचौरे यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा

महामार्ग पठारी भागातून जात असल्याने अवजड वाहतूक करणारे ट्रक कंटेनर तसेच साखर कारखानदारीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच हा राज्यमार्ग शिर्डी शनिशिंगणापूर तसेच देवगड आणि नांदेड, माहूर, तिरुपती बालाजीसारख्या तीर्थक्षेत्रांना जोडत आहे. त्यामुळे वाहनांची तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते. हा राजमार्ग ज्या भागातून जातो तो भाग औद्योगिक व कृषी क्षेत्राशी निगडित असल्यामुळे या क्षेत्राशी निगडित असलेल्या कच्च्या मालांची वाहतुकीही मोठ्या प्रमाणात सुरू असते.

त्यामुळे सध्याचा रस्ता हा अपुरा पडत आहे. या अपुऱ्या

रस्त्यामुळे दररोज अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांना या अपघातातून अपंगत्व आलेले आहे. तसेच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हा रस्ता प्रमुख राज्यमार्ग असल्यामुळे या रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. या रस्त्याची परिस्थिती पाहता या मार्गाला तातडीने चौपदरीकरण करण्याची मंजुरी आपण द्यावी, अशी मागणी खासदार वाकचौरे यांनी केली. याबाबत खासदार वाकचौरे यांनी दिलेल्या निवेदनावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे