राष्ट्रीय आरोग्य अभियान’ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा १४ वा दिवस “राज्याची आरोग्यसेवा विस्कळीत” !
1 min readपालघर: आरोग्य विभागाच्या अखत्यारितील राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या सुमारे ३४ हजार डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या संपाच्या १४ व्या दिवशी आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होताना दिसत आहे. आरोग्य उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून थेट जिल्हा रुग्णालयांपर्यंत आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. लसीकरण कार्यक्रम, असंसर्गजन्य आजारांची नोंदणी तसेच क्षयरुग्णांना औषध पुरवठ्यापासून शालेय आरोग्य तपासणी आदी कामे बंद पडण्याच्या मार्गावर असून जोपर्यंत सेवेत कायम करण्यासह अन्य मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे. उद्या राज्यभरातील जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय कार्यालयांसमोर आंदोलक थाळीनाद करणार आहेत तर त्यानंतर राज्यभर साखळी उपोषण केले जाणार असल्याचे एनएचएम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले