फार्मासिटिकल्स कंपनीत वायूगळती, चार जणांचा श्वास गुदमरुन मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
तारापूर दि.२२. – पालघरमधील तारापूर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मेडली फार्मासिटिकल्स या कंपनीत वायूगळती झाल्यानं चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. वायूगळती झाल्यामुळे सहा जणांचा श्वास गुदमरला, उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर एक १३ स्थित मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड औषध तयार करणारी कंपनी आहे. कंपनीत एलबेंडेझोलचे उत्पादन सुरू असताना प्रक्रियेदरम्यान अचानक टँकमधून नायट्रोजन वायूची गळती झाली. आज गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. वायुगळती झाल्यामुळे कंपनीत असलेल्या कामगारांना वायुगळतीची बाधा झाली आणि त्यांचा श्वास गुदमरला.सहा कामगारांना वायुगळतीची बाधा झाल्याने तातडीने उपचारासाठी बोईसर येथील शिंदे रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सहापैकी चार कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापति आणि कमलेश यादव अशी मृत कामगारांची नावे आहेत. रोहन शिंदे व निलेश हाडळ या दोन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.