जयहिंद फार्मसी महाविद्यालयात ‘सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स’ विषयावर सात दिवसीय कार्यशाळा संपन्न
वडगाव कांदळी (पोपट बढे) – जयहिंद कॉम्प्रेहेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी येथे ‘सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स’ या विषयावर सात दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ आणि संस्थेच्या संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते तसेच सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात रिलायबल श्री इंडस्ट्रियल ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, जळगाव चे डायरेक्टर अनिल विसपुते आणि त्यांच्या टीममध्ये प्रणाल मेहेर, रोशनी जाधव व वर्षा सुरळके यांचा सहभाग होता. अनिल विसपुते सर यांनी ‘सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स’ या विषयावर सविस्तर माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना या उपकरणांचा उपयोग व महत्त्व समजावून सांगताना औषध निर्मिती मध्ये यांचा कसा वापर होतो याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

या कार्यशाळेत अंतिम वर्षातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान विविध ॲनालिटिकल उपकरणांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व उपकरणांची कार्यपद्धती, देखभाल व औद्योगिक वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपानिमित्त प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला, ज्यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेतील त्यांच्या अनुभवांबाबत मनोगत व्यक्त केले आणि या संधीमुळे पुस्तकी अभ्यास व प्रत्यक्ष काम करण्यातील फरक काय आहे याची संपूर्ण माहिती व व्यावहारिक ज्ञानाचा लाभ झाल्याचे सांगितले.
यावेळी श्री इंडस्ट्रियल ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर जळगाव यांच्यात शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य दृढ करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, शैक्षणिक व औद्योगिक दुवा प्रस्थापित करणे, संशोधन क्षेत्रात सहयोग साधणे तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी कार्यशाळा, इंटर्नशिप व संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे हा आहे.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग तसेच रिलायबल श्री इंडस्ट्रियल ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर व इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन – लोकल ब्रांच, आळेफाटा यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पल्लवी बढे यांनी आभार प्रदर्शन केले.