आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

ग्रामोन्नती मंडळाच्या संकुलामध्ये कृषि शिक्षण सुरु करण्यासाठी स्व.तात्यासाहेब भुजबळांचे योगदान मोठे – कृषिरत्न अनिल मेहेर

1 min read

वडगाव कांदळी :- कृषि शिक्षणाचा यज्ञ अविरत सुरु राहण्यासाठी श्रीमान महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळांचे योगदान खूप प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी तात्यासाहेब भुजबळ यांच्या ५१ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात काढले.

ग्रामोन्नती मंडळ कृषि शिक्षण संकुलाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे १० सप्टेंबर रोजी तात्यासाहेब भुजबळ यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात तात्यासाहेब भुजबळ यांच्या प्रतिमेची मिरवणूक व समाधीचे विधीवत पूजन केले गेले. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे यांच्या हस्ते विधीवत समाधी पूजन संपन्न झाले. यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, उपकार्याध्यक्ष डॉ.आनंद कुलकर्णी, कार्यवाह रविंद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, कृषि शिक्षण संकुलाचे प्रमुख रत्नदीप भरविरकर, संचालक डॉ.संदीप डोळे, तान्हाजी वारुळे, आल्हाद खैरे, देविदास भुजबळ, कुणाल भरविरकर, तात्यासाहेब भुजबळांचे कुटुंबीय, विविध विभागांचे विभागप्रमुख , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व.तात्यासाहेब भुजबळांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित होऊन भूमिगत राहून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी म्हणून कार्य केले. त्यांनी संस्थेला त्या काळात कृषि शिक्षणासाठी १६ एकरचा मळा दिला. त्याचेच फलित आज गरीबातील गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि आपल्या संस्थेतील विद्यार्थी देशात आणि विदेशात आपले नावलौकिक करत आहे. आज देशाच्या विकासात अन्न धान्य निर्मितीत आपले संस्थेचे देखील खारीचा वाटा राहिलेला आहे, याचा अभिमान देखील वाटतो. त्या काळात गुरुवर्यांनी घालून दिलेला पायंडा जोपासताना विद्यार्थी व शेतकरी यांना चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करून देण्यावर संस्थेचा भर आहे. असे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी आवर्जून नमूद केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कृषि शिक्षण संकुलाच्या विविध विभागांमधील वार्षिक कार्याच्या अहवालाचे वाचन कृषि तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रा.राधाकृष्ण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन हॉर्टिकल्चर विभागाचे प्रमुख डॉ. सत्यवान थोरात यांनी केले आणि आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.प्रशांत शेटे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे