विशाल जुन्नर फार्मसी महाविद्यालयामध्ये स्पर्धापरीक्षांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
वडगाव कांदळी (पोपट बढे):– विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे (ता. जुन्नर) या महाविद्यालयांमध्ये अध्यक्ष अंकुश सोनवणे, संस्थेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी क्षेत्रामध्ये विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या शासकीय नोकरीच्या संधी या विषयावर अगस्ती अकॅडमी मार्फत शुभम ठाकरे यांचे व्याख्यान मंगळवारी (दि.१६ सप्टेंबर) आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी डी गायकवाड , प्राचार्य डॉ. एस एल जाधव व प्राचार्या डॉ. रूपाली हांडे यांच्याउपस्थित पाहुण्याचा सन्मान करून कार्यक्रम सुरवात झाली. शुभम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फार्मसी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या शासकीय संधी म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर, वैद्यकीय आणि रेल्वे विभागात औषधनिर्माण अधिकारी म्हणून निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा व त्या परीक्षांसाठी असणाऱ्या परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, विषयानुसार गुण विभागणी व चालू घडामोडींचे वाचन याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. आश्लेषा चिंचवडे केले. प्रा. अक्षदा हुलवळे यांनी सभागृहाचे आभार प्रदर्शन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.