विशाल जुन्नर फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक औषधनिर्माता दिन उत्साहात साजरा.
1 min readवडगाव कांदळी:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे व इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन लोकल ब्रांच आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष अंकुशशेठ सोनवणे व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ सप्टेंबर रोजी जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ” थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट ” या संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजुषा, स्लोगन व लोगो डिझाइन करणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. राजीव सावंत कॅम्पस डायरेक्टर- समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी डी गायकवाड , प्राचार्य डॉ. एस एल जाधव , प्राचार्या डॉ. आर ए हांडे यांच्या शुभहस्ते औषधनिर्माण शास्त्राचे जनक प्रोफेसर महादेव लाल श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. डॉ. राजीव सावंत यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण केले व पुढील शैक्षणिक काळात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. डॉ. सावंत यांना औषधनिर्माण शास्त्रामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फार्मसी क्षेत्र किती महत्वाचं आहे याचे अनेक दाखले त्यांनी दिले जस की कोरोना काळामध्ये सर्व देशांना प्रतिबंधात्मक लस पुरविणारा भारत देश होता, जगात टोचण्यात येणाऱ्या प्रत्येकी ५ लसीपैकी ३ भारतात बनतात. त्यामुळं औषधनिर्माण शास्त्रामध्ये करीयरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्यावर आधारित आपण या क्षेत्रात आपला ठसा निर्माण करू शकतो. अशा विविध विषयावर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेमधील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सभागृहाचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.