विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत व्ही. जे. स्कूलचा डंका
1 min readविभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत व्ही. जे. स्कूलचा डंका
वडगाव-कांदळी :-विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवणाऱ्या व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी-कांदळी (ता. जुन्नर)या संस्थेच्या विद्यार्थिनीने आणखी एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडलेल्या विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आराध्या गणेश हाडवळे हिने उल्लेखनीय नेमबाजी करत कांस्यपदक पटकावले आहे.
आराध्याने आपल्या अचूक लक्षवेधक नेमबाजीच्या जोरावर राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी (नागपूर) पात्रता मिळवली असून, ही संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी आराध्याचे अभिनंदन करत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला दिशा देण्यासाठी आमचे शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत. आराध्याची ही कामगिरी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
या यशामागे मार्गदर्शक म्हणून किशोर काकडे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या उत्कृष्ट प्रशिक्षणामुळेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नेमबाजी कौशल्य विकसित झाले आहे.
विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांनी आराध्याचे मनःपूर्वक कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.