आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे :सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे

वडगाव कांदळी: – ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय शिस्त व व्यक्तिमत्व विकास या विषयावर नारायणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण सपांगे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
सुरुवातीला कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक संजय वलटे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एपीआय प्रवीण सपांगे यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त आणि व्यक्तिमत्व विकास याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात खचून न जाता सातत्यपूर्ण अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले पाहिजे. आपण एक सुजाण नागरिक असल्याने आपली जबाबदारी ओळखून आपले सामाजिक वर्तन योग्य ठेवले पाहिजे. यामध्ये सायबर सेक्युरिटी, विद्यार्थी शिस्त, बाईक रायडिंग, छेडछाड आदी गंभीर विषयांवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना कायद्याविषयी माहिती दिली. नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनासुद्धा त्यांनी दिल्या. व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी पोलीस कॉन्स्टेबल दत्ता ढेंबरे, व्यावसायिक विभाग प्रमुख डॉ. सत्यवान थोरात, विज्ञान विभाग प्रमुख नितीन पोखरकर, सर्व शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घेतले तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होऊन गुणवत्तेत वाढ होईल, असा विचार उपस्थितांनी व्यक्त केला.
उपप्राचार्य हनुमंत काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेटे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे