आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

वैभव सदाकाळ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

1 min read

वडगाव कांदळी:- जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक वैभव बबनराव सदाकाळ यांना पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार ता 7 रोजी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते सदाकाळ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

        वैभव सदाकाळ हे येणेरे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. शाळेमध्ये आनंददायी शिक्षण, बोलक्या भिंती, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये लोकसहभाग मिळवणे आदी महत्वपूर्ण काम सदाकाळ यांच्या माध्यमातून झाले आहे. या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळविण्यात सदाकाळ यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांना जिल्हा परिषदेकडून देखील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

      यावेळी माजी आमदार दिलीपराव ढमढेरे, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता विजय खरे, राष्ट्रीय सेवा दलाचे अजित शिंदे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष अनिल माने, जिल्हाध्यक्ष विनोद गोरे, सचिव शिवाजी खांडेकर, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, माध्यमिक शिक्षक संघाचे विकास दांगट, शिक्षक नेते सदू मुंडे, कार्यालयीन चिटणीस संतोष पानसरे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक दिलीप लोहकरे, दीपक पानसरे, मिलिंद औटी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे