व्ही. जे. स्कूलमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन उत्साहात साजरे
1 min read
वडगाव कांदळी:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी ,कांदळी येथे ख्रिसमस अर्थात नाताळ सणाचे सेलिब्रेशन अत्यंत आनंदी, उत्साही व रंगतदार वातावरणात साजरे करण्यात आले. प्रेम, आनंद, दयाळूपणा आणि आपुलकीचा संदेश देणारा हा सण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात ख्रिसमसच्या मंगलमय वातावरणात करण्यात आली. शाळेतील प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लाल व रंगीबेरंगी आकर्षक पोशाख परिधान करून नाताळ सणाचा मनसोक्त आनंद लुटला. संपूर्ण प्रांगणात उत्साह, चैतन्य आणि बालसुलभ आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी शिक्षिका सौ. मानसी पाचपुते यांनी सांताक्लॉजची भूमिका साकारत विद्यार्थ्यांचे विशेष मनोरंजन केले. सांताक्लॉजसोबत गाणी, संगीत, नृत्य आणि खेळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी निखळ आनंद अनुभवला. सांताक्लॉजकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

प्री-प्रायमरी विभागातील शिक्षिका सौ . रूथ खैरे यांनी कलाशिक्षक श्री. रोशन बनकर सर यांच्या समवेत सुंदर, आकर्षक व आदर्श असा ख्रिसमस ट्री तयार केला. या ख्रिसमस ट्रीचे महत्त्व, त्यामागील संदेश आणि नाताळ सणाचे मूल्य विद्यार्थ्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी ख्रिसमस ट्रीसोबत फोटो काढत आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद केले.
याचप्रमाणे शाळेच्या प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनीही ख्रिसमस सण उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम इयत्ता नववी मधील कुमारी भूमी रावळकर व साईश्री खिल्लारी या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर ख्रिसमस म्हणजेच “नाताळ” या सणाचे विशेष महत्त्व विद्यार्थ्यांना माहिती रूपाने कुमार नील वाघमोडे या इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांने पटवून दिले. क्रीडा शिक्षक श्री. -अमेय देशमुख यांनी सांताक्लॉज चा वेश धारण करून विद्यार्थ्यांचे अतिशय निखळ मनोरंजन केले. विविध उपक्रम, गाणी व नृत्य करत आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांनी सांताक्लॉज सोबत नाताळ सणाचा मनमुराद आनंद व अनुभव घेतला.
या ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, मैत्री, दयाळूपणा व आनंद वाटण्याची भावना अधिक दृढ झाली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री तांगतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.
विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्मा . अध्यक्ष श्री अंकुशशेठ सोनवणे तसेच सन्मा. सी.ई.ओ श्री दुष्यंत गायकवाड सर यांचे या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन लाभले.