पंचायतराज अभियानातून काळवाडी ग्रामपंचायतचा सन्मान
1 min read
वडगाव कांदळी :- सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या विविध विषयावर कामकाज सुरू आहे. या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील पर्यावरण व स्वच्छतेसाठी चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना ई.व्ही. घंटागाडी देऊन सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सुरू केला आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील काळवाडी ग्रामपंचायतचा सन्मान पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पंचायत समिती हवेलीच्या विस्तार अधिकारी जयश्री बेनके यांच्या उपस्थितीत काळवाडी गावचे सरपंच तुषार वामन, उपसरपंच बाबासाहेब वामन ग्रामविकास अधिकारी आर के जाधव, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ बेल्हेकर, अनिकेत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
ग्रामपंचायत काळवाडीने मागील कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सन २०२०- २१व २०२१- २२मध्ये राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकाविला होता. आज पर्यंत ग्रामपंचायत ने यशवंत पंचायत राज अभियान २०१४,पर्यावरण विकास रत्न २०११, स्मार्ट ग्राम पुरस्कार२०१६, ग्राम पुरस्कार २०२४ इत्यादी पुरस्कार ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने मिळालेले असल्याबाबतची माहिती ग्रामविकास अधिकारी आर के जाधव यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये गावाने तालुक्यातील सर्वात जास्त लोक वर्गणी जमा करणे १००% कर वसुली करणे, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन करणे इत्यादी कामे अभियान कालावधीत केल्यामुळे ग्रामपंचायतचा जिल्हा परिषदेमार्फत सन्मान करण्यात आला. याबाबत सरपंच तुषार वामन यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, पंचायत समिती अधिकारी वर्ग व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.
ग्रामपंचायत काळवाडी मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सुनील वामन यांच्या अध्यक्षतेखाली अभियान समिती स्थापन करण्यात आली आहे त्यांचे मार्गदर्शन, नियोजन व कल्पकतेमुळे गावांमध्ये विविध उपक्रमांची सुरुवात व अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू आहे त्या सर्व अभिनव उपक्रमांमध्ये प्रत्येक घरासमोर आरोग्यदायी परसबाग नव्याने साकारत असलेले कृषी पर्यटन, घनकचरा संदर्भात अभिनव उपक्रमांचे अंमलबजावणीसाठी ग्रामस्थ सहभाग घेऊन सहकार्य करीत असलेबाबत उपसरपंच बाबासाहेब वामन यांनी समाधान व्यक्त केले.
नवनवीन उपक्रमांची सर्व ग्रामपंचायत सदस्य, अभियान समिती सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी ,विविध विभागातील सर्व शासकीय कर्मचारी हे मेहनत घेत असले बाबत सर्व ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत असलेल्याबाबतची माहिती सरपंच तुषार वामन यांनी दिली