आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

मकरसंक्रांतीनिमित्त व्ही. जे . स्कूलमध्ये पतंगोस्तव साजरा

1 min read

वडगाव कांदळी :- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, कांदळी (नगदवाडी) येथे मकर संक्रांतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी पतंग उडविण्याचा आनंददायी व शैक्षणिक उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह संपूर्ण शाळा परिसरात पाहायला मिळाला.
मकर संक्रांती हा सण सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शविणारा असून या काळात सूर्यप्रकाश अधिक लाभदायक ठरतो. याच वैज्ञानिक व भौगोलिक पार्श्वभूमीची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतःचे पतंग व पर्यावरणपूरक साधा दोरा (मांजा न वापरता) वापरून सुरक्षित पद्धतीने पतंग उडवले.
या कालावधीत मिळणारा सूर्यप्रकाश शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. सकाळच्या कोवळ्या उन्हात राहिल्यामुळे व्हिटॅमिन ‘डी’ मिळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते व मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. पतंग उडवताना होणारी शारीरिक हालचाल, एकाग्रता व समन्वय कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या विकसित होतात.
भौगोलिकदृष्ट्या पाहता, मकर संक्रांतीपासून दिवस मोठे होऊ लागतात व हवामानात बदल जाणवतो. या ऋतुबदलाशी सुसंगत म्हणून पतंग उडवण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आकाशाकडे नजर लावून पतंग उडवणे हा केवळ खेळ नसून निसर्गाशी नाते जोडणारा अनुभव आहे, याची अनुभूती विद्यार्थ्यांनी घेतली.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी कलर ड्रेस परिधान करून सणाचा आनंद द्विगुणित केला. शिक्षिका.सौ .पुनम नरवडे यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना माहिती देताना कार्यक्रमाची प्रस्तावना केली ,त्यानंतर इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी कुमारी राजलक्ष्मी आहेर व कुमारी प्रार्थना भोर तसेच इयत्ता सातवी मधील कुमारी स्वराली वाळुंज या विद्यार्थिनींनी “मकर संक्रांत “या सणाचे महत्त्व इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि त्यांच्याबरोबर प्रश्न उत्तर रूपाने संवादही साधला. शिक्षकांनी संक्रांतीचे सांस्कृतिक महत्त्व, तिळगुळाचे प्रतीकात्मक अर्थ – “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” – तसेच सामाजिक सौहार्दाचा संदेश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. प्री प्रायमरी विभागातील शिक्षिका सौ.रूथ खैरे यांनी व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी मिळून कलात्मक असे सुंदर “सॉफ्ट बोर्ड डेकोरेशन” करून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील “मकर संक्रांत” या सणाचे सेलिब्रेशन करत असताना विविध रंगांची रंगसंगती करून सुंदर अशी चित्रे काढली व आनंद घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की,
“परंपरा, विज्ञान आणि आरोग्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे मकर संक्रांती. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो.”
अशा प्रकारे पतंगोत्सवाच्या माध्यमातून आनंद, आरोग्य, विज्ञान आणि संस्कृती यांचा संगम साधत व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये मकर संक्रांती सण उत्साहपूर्ण व अर्थपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हा दिवस आनंदाने अनुभवत शिकण्याचा वेगळा आनंद घेतला.
या उपक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्मा. अध्यक्ष श्री अंकुश शेठ सोनवणे तसेच सन्मा.सी.ई.ओ श्री दुष्यंत गायकवाड सर यांचेही मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे