अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार विलास तरे
1 min readअतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार विलास तरे
पालघर, विरार ( ईश्वर मुकणे) :- वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांच्या कडे देऊन केली आहे.
यावेळी आमदार तरे म्हणाले की, वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीसह पालघर जिल्ह्यातील परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना दैनंदिन व्यवहार करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे निदर्शनास येत आहेत की, पावसामुळे शहरातील मुख्य व गौण रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था व पाण्याचा साचलेला ठिकठिकाणी साठा यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी शाळकरी मुले, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाला प्रवास करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे जलवाहिन्या तुटणे, गळती होणे तसेच गाळ साचणे यामुळे अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेचा व अशुद्ध पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नाले व गटारे वेळेत न साफ केल्यामुळे अनेक वस्ती व गृहनिर्माण संकुलांमध्ये पाणी साचून घरगुती वस्तूंचे नुकसान झाले आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढून साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे.
वसई-विरार शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांना दिले निवेदन
उक्त गंभीर परिस्थितीच्या अनुषंगाने, सर्व मुख्य व उपरस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक व्यवस्थेला गती द्यावी, प्रभावित भागात वाहतूक सुरळीत राहावी याकरिता वाहतूक शाखेसह समन्वय साधून अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करावी, जलवाहिन्यांची तपासणी करून तुटलेल्या व गळती झालेल्या पाइपलाईनची तत्काळ दुरुस्ती करावी व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, नाले व गटारे तातडीने साफ करून पाणी निचऱ्याची व्यवस्था सुरळीत करावी, पूरग्रस्त व बाधित भागात आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांना वैद्यकीय मदत व आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत, तसेच, परिवहन सेवा सुरळीत करणे, या तातडीच्या उपाययोजना करण्यात याने आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वसलेली असून उक्त समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. नागरिकांच्या जीवनमानावर होणारा परिणाम लक्षात घेता आपण तातडीने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी 131 बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदन वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांच्या कडे देऊन केली आह.
● पाणी उकळून पाण्याबाबत जनजागृती करावी.
● डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषध फवारणी व धुर फवारणी करावी.
● आरोग्य सुविधा प्रभावी करावी.