आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वाबळेवाडीच्या गोरक काळे यांना जाहीर

1 min read

शिरूर :-  पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी( ता. शिरूर ) ची शाळा  राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. आता याच वाबळेवाडीच्या शाळेच्या प्रसिद्धीत आता नव्याने या पुरस्कारामुळे भर पडणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी शिक्षक गोरक भाऊसाहेब काळे यांना जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, विद्यार्थीकेंद्री अध्यापन पद्धती व शैक्षणिक गुणवत्तावृद्धी यासाठी घेतलेले अथक परिश्रम यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.


गोरक काळे हे दि.२६ जुन २०१९ पासुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी (ता. शिरूर ) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सन २०२४ मध्ये शाळेला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम अकरा लाख रुपये मिळाले.

याशिवाय, त्यांनी विविध स्पर्धांमध्येही यश संपादन केले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि राज्यस्तरावर सहभाग. उद्योजकतेची मानसिकता अंतर्गत मॉडेलने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे.

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सव जिल्हा पातळीवर

कविता गायन – प्रथम क्रमांक

प्रश्नमंजुषा – प्रथम क्रमांक

बुद्धिबळ – द्वितीय क्रमांक विद्यार्थ्यांनी मिळवला.

शाळेच्या गुणवत्तेबरोबर विकासात आजपर्यंत सक्रीय सहभाग घेतला आहे. २०२४ मध्ये झालेल्या NMMS च्या परीक्षेत इ.८ वी च्या वर्गात ३७ शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी असून विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम १७,७६,०००/- इतकी आहे. तसेच इ. ८ वी च्या वर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ३१ असून त्या पैकी राज्य गुणवत्ता यादीतील १६ विद्यार्थी आहेत ही विशेष बाब आहे.


विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, डिजिटल शिक्षण साधनांचा वापर आणि बालमैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती या त्यांच्या कार्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा सतत उंचावत आहे. याच कार्याची दखल घेत पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कार साठी निवड केली आहे.


हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकारी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ व पालकवर्ग यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सेवेला मिळालेली ही दाद त्यांना अधिक प्रेरणा देणारी ठरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे