आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

शेतकरी कुटुंबातील प्रथमेश कोरडे याची बँक अधिकारी पदावर निवड झाल्याने सत्कार

1 min read

वडगाव कांदळी(पोपट बढे):- जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथील प्रथमेश प्रशांत कोरडे यांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर पदासाठी निवड झाली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल धर्मवीर संभाजीराजे संस्थेच्या वतीने संस्थापक /अध्यक्ष प्रकाश नेहरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना श्री. प्रकाश नेहरकर म्हणाले की, शेतकरी कुटुंबातून बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर पोहोचणे ही अभिमानास्पद बाब आहे. अशा यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळते. कष्ट, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या जोरावर स्वप्न साकार करता येतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रथमेश कोरडे आहेत. त्यांच्या या यशामुळे समाजातील इतर युवकांनीही ध्येय निश्चित करून प्रयत्नशील राहावे.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी प्रथमेश यांचे यश म्हणजे केवळ वैयक्तिक नसून गावाचे व तालुक्याचेही नाव उंचावणारी घटना असल्याचे मत व्यक्त केले. शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणाने बँकिंग क्षेत्रातील स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवणे हे विशेष कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

सत्कार सोहळ्याला कोरडे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील तरुण उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन प्रथमेशचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

या सत्कार समारंभ वेळी प्रथमेश यांनीही आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, हे यश केवळ माझे नसून माझ्या कुटुंबाचे, शिक्षकांचे आणि मित्रपरिवाराचे आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वतःवरील विश्वास यामुळेच मला हे यश मिळवता आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे