आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदलवाडी यांच्यावतीने गोवर- रूबेला लसीकरण शिबिराचे आयोजन

1 min read

धुंदलवाडी ( हेमेंद्र पाटीदार) :- केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार राज्यात १५ ते ३० सप्टेंबर गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमधल्या ५ ते १५ वर्षे वयोगटातल्या बालकांना या लशीचा एक अतिरीक्त डोस दिला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित केलं जाणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून आज दि.२३सप्टेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधाट व वैद्यकीय अधिकारी धुंदलवाडी डॉ. माधुरी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदलवाडी कार्यक्षेत्रातील आदिवासी विकास विभाग यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा धुंदलवाडी येथे गोवर व रुबेला लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी धुंदलवाडी डॉ. ऐश्वर्या पाटील यांच्या हस्ते झाले.


गोवर व रुबेला या संसर्गावर विशिष्ट औषध उपलब्ध नसल्यानं लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जातो. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी,” असे आवाहन डॉ. ऐश्वर्या पाटील यांनी केले. या लसीकरण मोहिमेअंतर्गत शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदलवाडी येथील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य साहाय्यक ,आरोग्य सहाय्यीका, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गट प्रवर्तक उपस्थित होते. या लसीकरणासाठी शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक यांनी मोलाचे सहकार्य लाभले. हे लसीकरण शिबीर आयोजनासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर धुंदलवाडी येथील आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविका यांनी अथक परिश्रम घेतले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे