इगतपुरी-वाढवण एक्स्प्रेसवेला मान्यता; औद्योगिक आणि शेतीला आंतरराष्ट्रीय फायदा
1 min readनाशिक : नाशिक जिल्ह्याला पालघरमधील वाढवण बंदराशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी इगतपुरी-वाढवण एक्स्प्रेसवे तसेच ‘फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार असून, वाढवण बंदर (तवा) ते समृद्धी महामार्गावरील भरवीर इंटरचेंजदरम्यान सुमारे १०४.८९८ किमी लांबीच्या फ्रेट कॉरिडॉरला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २,५२८.९० कोटींच्या भूसंपादनासह विविध प्रशासकीय मंजुऱ्या देण्यात आल्या. या प्रकल्पासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा केला होता.
औद्योगिक आणि शेतीला आंतरराष्ट्रीय फायदा
या निर्णयामुळे नाशिक जिल्हा, मराठवाडा, विदर्भ व इतर अंतर्गत भागातील औद्योगिक व शेती उत्पादनांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणी अधिक सुलभ व किफायतशीर होईल. वाढवण बंदर हे भारतातील सर्वात खोल आणि आधुनिक सागरी टर्मिनलपैकी एक राहणार असून, ‘आयएमईईसी’ व ‘आयएनएसटीसी’सारख्या आंतरराष्ट्रीय व्यापारमार्गांशी ते थेट जोडले जाणार आहे. या सगळ्याचा थेट फायदा महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत विकासाला होणार आहे.