आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

प्राचीन काळातील गोआधारित जीवनशैलीमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी : डॉ. आदेश काशीद

1 min read

प्राचीन काळातील गोआधारित जीवनशैलीमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी : डॉ. आदेश काशीद

वडगाव कांदळी:- देशी गोपालन, गोआधारित उत्पादने, सौंदर्य प्रसाधने, पंचगव्य इत्यादी उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना पारंपारिक दूध उत्पादनाबरोबर उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनीही प्रचलित मार्गाने न जाता उद्योजकीय कौशल्य प्राप्त करून या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन वात्सल्य युनिक प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष डॉ. आदेश काशीद यांनी केले.नारायणगाव येथे प्रथम वर्ष डेअरी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी शिक्षण संकुल नारायणगाव येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका (डेअरी डिप्लोमा) अभ्यासक्रमाचा स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी कृषी शिक्षण संकुलाचे चेअरमन रत्नदीप भरवीरकर होते. प्रमुख ॳतिथी डॉ. आदेश काशीद आणि गो फॉर एग्री एलएलपी, पुणेचे संचालक आणि विदेशी कृषी शिक्षणाचे समुपदेशक ओंकार इचके हे उपस्थित होते.

डेअरी डिप्लोमा या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना जर्मनी, डेन्मार्क, आयर्लंड, स्वित्झर्लंड , ऑस्ट्रेलिया यासह अनेक देशामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधीबाबत सखोल मार्गदर्शन ओंकार इचके यांनी केले. परदेशामध्ये डेअरी उद्योगासाठी प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे, परंतु त्यासाठी आवश्यक ते कौशल्य हस्तगत केल्यास आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून देता येतील. इंग्रजी भाषेवर उच्चतम प्रभुत्व आणि चांगले हस्तकौशल्य या दोन बाबींवर परदेशामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत, असे ओंकार इचके म्हणाले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. संस्थेत उपलब्ध असणाऱ्या सोयी – सुविधा, अभ्यासक्रम व इतर अनेक बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अशी माहिती प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी दिली.

प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. प्रतीक पाचपुते तर सूत्रसंचालन प्रतीक्षा अभंग यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजश्री कवडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे