आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

व्ही. जे. स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

1 min read

व्ही. जे. स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

 

वडगाव कांदळी:- अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीचे संकट ओढवले आहे. या कठीण परिस्थितीत व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी,कांदळी ( ता. जुन्नर)येथील विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखत एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊपोटी साठवलेल्या रकमा आणि खिशातील बचतीमधून एकत्रित निधी जमा करून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्त केला. हा निधी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने तयार केलेल्या चेकच्या स्वरूपात थेट जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्याकडे शाळेच्या प्रांगणात सादर केला. त्यावेळी आमदार शरद सोनवणे यांनी मुलांच्या या जबाबदारीचे कौतुक केले व म्हणाले की, अशा उपक्रमांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, समाजभावना आणि जबाबदारीची जाणीव दृढ होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील पावलामागे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे प्रोत्साहन आणि सर्व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लक्षणीय ठरले. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त विक्रांत काळे या उपक्रमावेळी शाळेत उपस्थित होते.

विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे , विश्वस्त, सी.ई.ओ. , शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकापुरते मर्यादित नसून मानवतेची जपणूक आणि समाजाबद्दलचे कर्तव्य यांचाही एक महत्त्वपूर्ण धडा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे