वडगाव (कांदळी) येथील शिवनेर केसरी २०२५ बैलगाडा शर्यतीला प्रेक्षकांची तुडूंब गर्दी
1 min readपुण्यासह ठाणे, नगर, नाशिक, संभाजीनगर व सातारा जिल्ह्यातील ६७५ स्पर्धकांचा सहभाग
वडगाव (कांदळी) – श्री बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठान तसेच चेअरमन सचिनशेठ निलख बैलगाडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव (कांदळी) ता.जुन्नर येथे परंपरेनुसार या वर्षी देखील बैलगाड्यांच्या भव्य शर्यती म्हणजेच शिवनेर केसरी २०२५ या मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुण्यासह ठाणे, नगर, नाशिक, संभाजीनगर व सातारा जिल्ह्यातील तब्बल १२०० बैलगाडा मालकांनी नावनोंदणी केली होती. परंतू स्पर्धा ठराविक दिवसांत पार पाडायची असल्या कारणाने सोडतीद्वारे ६७५ बैलगाडा मालकांना स्पर्धेत संधी देण्यात आली होती. सलग ३ दिवस सिरीयलचे बैलगाडे व एक दिवस स्वतंत्र सेमी व मेगा फायनल अशा टप्प्यात स्पर्धा घेण्यात आल्या.

पहिल्या दिवशी फळीफोड म्हणून भिकाजी सुर्याजी मुळे व संतोष कचरदास बारवे या जुगलबंदीचा बैलगाडा प्रथम तसेच बिभीषण तुकाराम भोसले व बबन गणपत पाचुंदकर या जुगलबंदीचा बैलगाडा घाटाच्या राजाचा मानकरी ठरला. दुसऱ्या दिवशी फळीफोड म्हणून संतोष (पप्पू) पिंगळे यांचा बैलगाडा प्रथम तसेच शर्विल स्वप्निल गवारी व शिव तुषार कावडे या जुगलबंदीचा बैलगाडा घाटाच्या राजाचा मानकरी ठरला. तिसऱ्या दिवशी फळीफोड म्हणून राम चंद्रकांत गाढवे व विष्णू बाळू पवार या जुगलबंदीचा बैलगाडा प्रथम तसेच नव्या हेमंत सस्ते व वाजे-पानसरे या जुगलबंदीचा बैलगाडा घाटाच्या राजाचा मानकरी ठरला. ३ दिवसांत प्रथम आलेल्या १७३ बैलगाड्यांमधून निवडक ७० बैलगाड्यांना सेमी फायनल मध्ये संधी देण्यात आली होती. घाटाच्या महाराजाचा बहुमान मुळशी तालुक्यातील माण येथील सुप्रसिद्ध उद्योजक बिभीषण तुकाराम भोसले व बबन गणपत पाचुंदकर या जुगलबंदीच्या बैलगाड्याने पटकाविला. सोहम किरण बागडे व आसिफ मुबारक मुलाणी या जुगलबंदीचा बैलगाडा मेगा फायनल ला सर्वात आतून येणारा बैलगाडा अर्थात शिवनेर केसरी २०२५ या मानाच्या किताबाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेसाठी ५ लाख ७० हजार ७२२ रूपये रोख १ ट्रॅक्टर, १० मोटार सायकल, ५ सोन्याच्या अंगठ्या, ५ कुट्टी मशीन, ५ वॉशिंग मशीन, ५ फ्रीज, ३ भव्य, चषक, १ महाराजा खुर्ची तसेच शिवनेर केसरी २०२५ या किताबाची चांदीची मानाची गदा आदी बक्षिसांचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी ४ दिवसांत विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांसह बैलगाडा शर्यत क्षेत्रातील हजारों बैलगाडा प्रेमींनी शर्यतींचा आनंद लुटला.
वडगाव (कांदळी) या गावाची बैलगाडा शर्यतींची पंढरी म्हणून ओळख
बैलगाडा शर्यतींसाठी संपूर्ण महाराष्ट्रात वडगाव (कांदळी) या गावाची ओळख निर्माण झालेली आहे. अतिशय उत्तम नियोजन, शर्यतीसाठी आलेल्या बैलांना बांधण्यासाठी व आरामाकरिता प्रशस्त जागा, घाटाची सुयोग्य धावपट्टी व बैलांना सुरक्षित पकडण्यासाठी सुसज्ज भव्य आळे यामुळे महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालक व शौकिनांची वडगाव (कांदळी) गावच्या बैलगाडा घाटाला नेहमीच पसंती असते. वर्षभरात अनेक वेळा या ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. या शर्यतींना देखील नेहमीच खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असतो.