हिंदमाता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा चाळीस वर्षानंतर संपन्न
1 min read
हिंदमाता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा चाळीस वर्षानंतर संपन्न
वडगाव कांदळी (पोपट बढे):-श्री. रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ, अणे संचलित हिंदमाता विद्यालय, वडगाव कांदळी येथील १९८५- ८६ या वर्षात इयत्ता दहावीला शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच माई पार्टी हॉल, १४ नंबर ( कांदळी) या ठिकाणी पार पडला. तब्बल ४० वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र आले होते. शालेय जीवनातील आपल्या आठवणींना त्यांनी या निमित्ताने उजाळा दिला.
विद्यालयाचे माजी ज्येष्ठ शिक्षक तुळशिराम कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी पारंपारिक फेटे परिधान केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर गणरायाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व शिक्षकांच्या वतीने करण्यात आले. शालेय जीवनात एकत्र शिकत असलेल्या परंतु सध्या दिवंगत झालेल्या माजी विद्यार्थ्यांना आणि दिवंगत गुरुजनांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर १९८५ – ८६या दहावीच्या वर्गाला शिकविणारे शिक्षक तुळशिराम कोरडे, अनिल विश्वासराव, अकाराम कवडे, नंदाराम भालेराव आणि मिरा लेंडे यांचा सन्मान शाल, पूर्ण पोशाख आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला आणि आपण करीत असलेल्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सिताराम काळे यांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सन्मान देण्यात आला. सर्व गुरुजनांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जीवनात जगत असताना आरोग्याला फार महत्त्व आहे, प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, आपल्या शेतीमध्ये प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे, बाहेरील पदार्थ खाण्यापेक्षा घरातील पदार्थ खाण्याला प्राधान्य दिले तर आरोग्याची कोणतीही समस्या निर्माण होत नाही, असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षक तुळशिराम कोरडे यांनी व्यक्त केले. माजी शिक्षक नंदाराम भालेराव, अनिल विश्वासराव, अकाराम कवडे आणि मीरा लेंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, सर्वजण स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि समाजात सुद्धा उल्लेखनीय कार्य करीत आहेत, याबद्दल सर्वांचे अभिनंदन उपस्थित सर्व गुरुजनांनी केले. शालेय जीवनात शिकत असताना कडक शिस्त ठेवल्यामुळे आज सर्व विद्यार्थी स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी आहेत. या पाठीमागे शिक्षकांचा कोणताही वाईट हेतू नसतो. आपण चांगले घडावे, जीवनात यशस्वी व्हावे आणि आपल्या कुटुंबाचे व शाळेचे नाव उज्वल करावे यासाठीच सर्व गुरुजन कष्ट घेत असतात, याही बाबींचा उल्लेख सर्व गुरुजनांनी आवर्जून केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अध्यक्षीय निवड डॉ. सत्यवान थोरात यांनी केली. आभार सुनील बेल्हेकर यांनी मानले आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण निलख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. सत्यवान थोरात, बाळकृष्ण निलख, साईनाथ फुलसुंदर, लहू भोर, पुष्पा गुंजाळ आणि सर्व माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. पुढच्या वर्षी सहकुटुंब कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असा मनोदय सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. तब्बल ४० वर्षानंतर भेटलेल्या आपल्या मित्रांना हृदयस्पर्शी निरोप देत स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.