प्रा. हनुमंत काळे यांचा कार्यगौरव सोहळा संपन्न
1 min read
वडगाव कांदळी:- ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा. प. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव (ता. जुन्नर) येथील उपप्राचार्य प्रा. हनुमंत किसनराव काळे यांचा सेवापुर्ती कार्यगौरव सोहळा नुकताच वसंत व्हिला सभागृहात संपन्न झाला. प्रा. काळे हे जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक असून त्यांनी या कनिष्ठ महाविद्यालयात 33 वर्षांची प्रदीर्घ सेवा केली. त्यांच्या या सेवा काळातील उल्लेखनीय बाबींमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या अद्यावत प्रयोगशाळा, शासन दरबारी असणारे शिक्षकांचे प्रश्न सोडवणे , संस्थेमधील अनेक भौतिक सुविधा निर्माण करणे, विद्यार्थ्यांची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ या प्रमुख बाबींचा उल्लेख करावा लागेल.
प्राध्यापक हनुमंत काळे हे इंदापूर मधील पळसदेव या गावचे भूमिपुत्र असून ते ग्रामोन्नती मंडळामध्ये 1992 साली रुजू झाले. सुरुवातीला उपशिक्षक म्हणून त्यांनी काम केले. 2023 पासून ते कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यामध्ये हनुमंत काळे यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर संस्थेमधील अनेक विकासाची कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहेत. संस्थेमध्ये अनेक पायाभूत सुविधा त्यांनी शासनामार्फत उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
प्रा.हनुमंत काळे हे वारकरी कुटुंबातील असून आपल्या कुटुंबाचा वारसा त्यांनी पुढे चालवलेला आहे. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक असून विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी त्यांनी सोडवून विद्यार्थ्यांना अनेक पायाभूत व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. संस्थेमधील सर्व प्रशासकीय बाबींमध्ये आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. 30 नोव्हेंबर 2025 रोजी प्रा. हनुमंत काळे शासकीय नियमानुसार आणि नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेने त्यांचा कार्यगौरव समारंभ आयोजित केला.
या कार्यक्रमासाठी मा.शिक्षण संचालक डॉ. दिगंबर पाटील व दिगंबर देशमुख तसेच मा शिक्षण उपसंचालक बाळासाहेब ओव्हाळ, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे राज्याचे मा सरचिटणीस प्रा. पंडितराव पाटील, मुंबई जिल्हा उपनिबंधक आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे पाटील, महाराष्ट्र केसरी हिराचंद काळे, राज्य परिवहन महामंडळाचे संचालक आणि एस टी कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताटे, अहिल्यानगरचे संस्थाचालक अशोक कारले, आहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उपनिरीक्षक श्रीराम थोरात तसेच हडपसरच्या साधना महाविद्यालयाचे प्रा. गोकुळदास टकले, ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाशमामा पाटे, मोनिका मेहेर, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, संचालक सदस्य तानाजी वारुळे, रत्नदीप भरवीरकर, ऋषिकेश मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ, वृंदावन पार्क सोसायटीचे सर्व सदस्य, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे, उपमुख्याध्यापिका मानसी भालेराव, पर्यवेक्षिका अनुपमा पाटे, निर्मला भुजबळ, पर्यवेक्षक सुनील ढवळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक संजय वलटे, व्यावसायिक विभागाचे प्रमुख डॉ. सत्यवान थोरात, पळसदेवचे ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे, निवृत्त पोलीस उप अधिक्षक जगन्नाथ काळे, पळसदेवचे सरपंच संतोष काळे, ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय आळे येथील प्राचार्य भवारी, राजुरी येथील संस्थाचालक सचिव श्री सरोदे परिसरातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, सेवक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. हनुमंत काळे यांचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आवर्जून हजर होते, अशी माहिती मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे यांनी दिली.